फुलवा कथा – १ / मेहमान – Vanchit Vikas

फुलवा कथा – १ / मेहमान

Posted By :

     अदनान, बेटा अदनान उपर आना. अम्मी मला वर खोलीवर बोलवत होती. फुलवामध्ये जाण्याची वेळ झाली होती. रस्त्यावर बॅट बॉलचा खेळ रंगात आला होता. पण अम्मीने परत हाक मारल्यावर खेळ सोडून जावेच लागले. खोलीवर आलो. दप्तर भरले. अम्मी खूप दमलेली होती. तिला आता झोपायचे होते. असे वाटायचे अम्मीने सकाळी लवकर उठवावे  माझे तोंड धुवून द्यावे. आंघोळ घालावी. छान  भांग पाडून द्यावा. गालावर पावडर लावावी. मोठ्या आरशासमोर उभे करून  सुरमा लावावा. लेकिन ऐसा नहीं होता था. यह सब अम्मी को कैसे बताएं. वह तो हमेशा थकी हुइ, परेशानसी रहती थी.

     फुलवा मध्ये आलो. आरतीताई, तृप्तीताई आधीच आले होते. माझा उदास चेहेरा बघून आरतीताईने प्रेमाने जवळ घेतले. म्हणाली, आनबेटा  रोज आंघोळ करून यावे, स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत.  अब  मैं क्या बोलता? काही बोलणे सुचलेच नाही. आपल्या अम्मीची तक्रार कशी करणार? गप्प बसलो. नेहमीच्या  मागच्या आवडत्या कोपर्‍यात जाऊन बसलो. या कोपर्‍याचे एक बरे आहे, कोणी आपल्याकडे बघत नाही. आपणही कोणात मिसळायची गरज नाही. एकट्याने बसून राह्ता येते.

     पण तेवढ्यात पार्वतीमावशी आली आणि मला बाथरूम मध्ये घेऊन गेली. गरम पाण्याने आंघोळ घातली. मला पाण्यात खेळायला खूप खूप आवडते. आणि साबणाचा वास तर इतका छान असतो. पार्वतीमावशीने मला घासून पुसून स्वच्छ करून टाकले.  उद्यापासून स्वच्छ कपडे घालून येण्यास मला बजावून सांगितले.

     तृप्तीताईने सांगितले आज वर्ग स्वच्छ करा. सगळा वर्ग आवरून ठेवा. मोठे पाहुणे येणार आहेत. पाहुणे येणार सांगितल्यावर मला खूप अस्वस्थ वाटायला लागले. भीती वाटायला लागली. मला मेहमान आलेले आजिबात आवडत नाहीत. आमच्या खोलीवर रोज नवीन मेहमान येतात. अम्मी म्हणते अंकल आले आहेत. ते माझ्याकडे रागाने बघतात. बीडी- सिगरेट, गुटका-तंबाखू आणायला  सांगतात. कधी कधी शराब आणायला पण सांगतात. रूममध्ये बसू देत नाहीत. बाहेर जायला सांगतात. मला माझी अम्मी हवी असते. तिच्याजवळ बसायचे असते. फुलवातील, शाळेतील सगळ्या गमती जमती सांगायच्या असतात. पण अम्मीचे माझ्याकडे लक्ष नसते. तिला फक्त आलेल्या अंकलशी बोलायचे असते. मला रात्री बाहेर बसून राहण्याचा कंटाळा येतो. अंधाराची भीती वाटते. भूक लागलेली असते. तशीच झोप लागून जाते.  रात्री कधी तरी अम्मी मला खोलीत घेऊन जाते. 

     संध्याकाळच्या, रात्रीच्या  खोलीवरील आठवणी दाटून येतात. भीती वाटायला लागते. खूप खूप रडू येते. आता  फुलवा मध्ये मेहमान येणार. ते माझ्याकडे रागाने बघणार. मला बाहेर जायला सांगणार. मला बाहेर जायचे नाही. तृप्तीताईने सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. आरतीताई बरोबर छान छान गाणी म्हणायची आहेत.  कोणाला सांगू हे सगळे? माझे कोणीच का ऐकत नाही? परत परत रडू येत होते.  आरतीताई जवळ आली. हसून म्हणाली, आनबेटा हे  मेहमान खूप चांगले आहेत. आपल्याला  कागदापासून फुले, फुलपाखरू, बेडूक, बोट करायला शिकवणार आहेत.  पण मेहमान चांगले असतात यावर विश्वास बसत नव्हता. भीती वाटत होती. रडणे चालूच होते.

     संध्याकाळी घरी  आलो.  अम्मी वाटच बघत होती. माझी कपड्याची पिशवी भरली. म्हणाली जल्दी चल बेटा हमें बाहर गांव जाना है. गडबडीने रिक्षात बसलो. रेल्वे स्टेशनवर आलो आणि मुंबईच्या रेल्वेत बसलो.  कुर्ला येथे रुखसारआंटी च्या खोलीवर आलो.  अम्मी तिला सांगत होती, वस्तीमध्ये पोलीस लोक त्रास देतात. कागदपत्रे मागतात. माझ्याकडे रेशनकार्ड नाही. आधारकार्ड नाही. पोलीस पकडून नेतात. गावाकडे  पाठवून देतात. गावाकडॆ अम्मी अब्बूला मी नको असते. माझे पैसे मात्र त्यांना हवे असतात. पोलीसांना मी येथे नको असते. कोठे जाऊ?  काय करू? अम्मी रडायला लागली. आंटी काहीच बोलली नाही. अम्मीला नमाज पढायला घेऊन गेली.

     काही दिवस असेच गेले. मी गल्लीतील मित्रांबरोबर बॅट बॉल खेळायचो. इकडे तिकडे फिरत रहायचो. अभ्यास नाही. शाळा नाही. फुलवा नाही. कंटाळा आला होता. अम्मी रोज पुण्याला वस्तीमध्ये फोन करीत होती. चौकशी करीत होती. एक दिवस आरतीताईचा अम्मीला फोन आला. माझी चौकशी केली. कोठे आहात विचारले. अदनानचा अभ्यास बुडत आहे. त्याला घेऊन या म्हणून सांगितले. आता अम्मीने परत पुण्याला जाण्याचे ठरचिले. आम्ही पुण्याला परत आलो. फुलवामध्ये मला सोडायला अम्मी आलेली होती. तृप्तीताई अम्मीला रागावली. माझा अभ्यास, शाळा बुडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. आता मी रोज फुलवामध्ये जातो. तेथे शाळेचा अभ्यास पूर्ण करतो. मी  तिसर्‍या वर्गाची परीक्षा पण पास झालो. अम्मीला खूप आनंद झाला. ती म्हणाली तू फुलवामध्ये जातोस म्हणून पास झालास.

     आता मी नूतन मराठी शाळेत चौथीच्या वर्गात बसायला लागलो. एक दिवस माझ्या दोस्ताने जगदीश ने सांगितले, उद्या गुरुपोर्णिमा आहे. त्यादिवशी गुरुची पूजा करतात. त्यांचे आशिर्वाद घेतात.  दुसर्‍या दिवशी, गुरुपोर्णिमेला मी तृप्तीताई,आरतीताई ला नारळ, फुले दिली. त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना खूप आनंद झाला.  मग सगळ्या मुलांनी  टाळ्या वाजवून  माझे कौतुक केले. मला छान वाटले.

     पावसाळा सुरु झाला होता.  वस्तीमध्ये खूप पाऊस पडत होता. वस्तीमध्ये सांगली, कोल्हापूर भागातून आलेल्या आंटी सांगत होत्या, आमच्याकडे खूप पाऊस पडला, नदी-ओढे-नाले यांना खूप मोठे पूर आले. झोपड्या, माणसे, जनावरे वाहून गेली. घरात छ्तापर्यंत पाणी भरले. शेतात पाणी घुसले. शेते  पाण्याने भरून गेली. खूप नुकसान झाले. मग मी, राजा, जगदीश, अहमदने मिळून खपटाची पेटी तयार केली. गल्लीतील सगळ्या दुकानांमध्ये जाऊन पूरातील लोकांना मदत करण्यासाठी पैसे मागितले. फुलवा मध्ये तृप्तीताई, आरतीताई, पार्वतीमावशी, लक्ष्मीमावशी सगळ्यांनी  पैसे  दिले. आरतीताईने वर्गात मला उभे केले आणि सगळ्या मुलांना सांगितले,  पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांसाठी अदनान किती चांगले काम करीत आहे. जमा झालेले सगळे पैसे वस्तीतील स्वामी  डॉक्टर कडे जमा केले. त्यांना आनंद झाला. त्यांनी आमचे कौतुक केले.  फुलवामध्ये  गणपतीबाप्पा आणला. आम्ही सगळ्या मुलांनी त्याची सजावट केली.  बाप्पाच्यामागे झिरमिळ्या लावल्या. मोठे   खपट कात्रीने कापले त्याची कमान बनविली. त्याला रंगीत कागद लावले. छान छान फुलांचे हार बनविले. आरतीताई, तृप्तीताई यांना सजावट आवडली. त्यांनी आम्हाला  शाबासकी  दिली.

     संध्याकाळ झाली होती. आता अंधार लवकर पडत आहे. फुलवामधून राजाबरोबर रमतगमत घरी आलो. बघतो तर खोलीला कुलूप होते. वाटले अम्मी येथेच कोठेतरी गेली असेल. अम्मी कोठे गेली आहे हेशेजारी अमीनाआंटी, यशोआंटीला पण माहित नव्हते.  रात्री खूप भूक लागली. पण काय करणार, खोलीच्या बाजूला खपटाखाली तसाच उपाशी झोपलो. थंडी वाजत होती. दप्तर पोटाशी घेऊन झोपलो. सकाळी सुद्धा अम्मी आली नव्हती. मला  अम्मी ची आठवण  यायला लागली. कोठे असेल?काय करीत असेल?तिने लवकर यायला नको का? मला एकट्याला सोडून कोठे गेली असेल? मला आता भीती वाटायला लागली. रडू यायला लागले.

     सकाळी तसाच फुलवामध्ये गेलो. पार्वती मावशीने स्वच्छ तोंड धुवून दिले. आंघोळ घातली. नाश्ता दिला. आरतीताई आली. तिला रडत रडत सगळे सांगितले. अम्मी मला सोडून गेल्याचे सांगितले. आरतीताईने जवळ घेतले. म्हणाली आपण सगळे मिळून अम्मीला शोधून काढू.  तेवढ्यात अमीना आंटी फ़ोन घेऊन आली. म्हणाली, आन तेरी अम्मीसे बात करले. अम्मी म्हणाली, बेटा अचानक बस्ती छोडकर जाना पडा. सरकारी लोग  कागजात मांग रहे है. घर घर में तलाशी चल रही है. इसलिए दुसरे गांव आई हुं. दो दिन में वापस आऊंगी. तब तक अमीनाआंटी के पास रहना. अम्मीचा आवाज ऐकला, तिच्याशी बोललो. लवकर ये, वाट बघतो म्हणालो. आता छान वाटले. मला सांगा  आपली आई आपल्या जवळच पाहिजे की नाही? यह सरकार क्यों मेरी अम्मी को सताती है? दोन दिवसांनी अम्मी आली.

     आज फुलवामध्ये शिरीष डॉक्टरने तपासले. आरतीताई त्यांना सांगत होत्या, कोणी पाहुणे आले की अदनान खूप अस्वस्थ होतो. घाबरून जातो. रडायला लागतो.  त्याची भीती कमी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. समोरच्या माणसाशी त्याला न घाबरता बोलता आले पाहिजे. डॉक्टरनी मला तपासले. खूप प्रश्न विचारले. मी पण जसे जमेल तशी उत्तरे दिली. शिरीष डॉक्टरनी औषधे दिली. ती रोज घेण्यास सांगितली. 

     पुण्यात कोरोनाची साथ आली. वस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शाळा बंद झाली. फुलवापण बंद झाले. अम्मीने निर्णय घेतला, मला बारामतीच्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे. मला अम्मीला सोडून जायचे नाही. मला येथेच अम्मीजवळ रहायचे आहे. अम्मीने मला जवळ घेतले  म्हणाली, बेटा आन मैं इन सरकारी लोगोंसे भाग भाग कर थक गयी  हुं. कहांसे कागज लेकर आऊं? कहांसे पहचान लेकर आऊं? तू बारामती को जा. वहां अच्छा स्कूल है. होस्टेल है. बहुत  मेहनत करना, पढाई करना. इतना बडा  आदमी बनना के लोग  कहेंगे यह आदनान की अम्मी है. अब के बाद तूही मेरी पेहचान बनेगा.

     मी बारामतीला शिकायला जायला तयार झालो.

(दि.१७/०८/२०२०)