चाकोरीतून सुटका – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/ssss.jpg

चाकोरीतून सुटका

Posted By :

Blog No.6

ती दवाखान्यात आमच्या समोर येवून बसे आणि विचारे, “तुम्हांला हे माहित आहे का?  किंवा म्हणे, अहो बघा ना तिथं अशी पद्धत आहे. किंवा असं म्हणे, “ आजकाल लोकांची रीतच बिघडली आहे.” आपण यावर प्रश्नार्थक चेहरा केला तर मात्र तिचा उत्साह आणखीन वाढायचा. त्या त्या दिवशी काय काय घडलं आहे? हे ती सविस्तर सांगू लागे. तुम्हांला वाटेल काय कौतुक करत आहात? कोणत्याही माणसाला बोलायची संधी मिळाली की ती व्यक्ती पाल्हाळ लावतेच. घरातलं आणि बाहेरचं स्वतःबद्दल सांगायला माणसाला आवडतंच.

तुमचं निरीक्षण अगदीच बरोबर आहे. पण मी ज्या व्यक्तीबद्दल तुम्हांला सांगत आहे ना? ती मात्र फार फार वेगळी आहे. शिवाय ती स्वतः बद्दल काहीच बोलत नाही.स्वतःच्या कामाबद्दल सुद्धा बोलत नाही. तर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या ती सांगते. मग तुम्ही म्हणाल, “त्यात काय एवढं कौतुक? हे तर कोणीही करतं.अनेकांच्या घरी पेपर येतो आणि रिकाम्या वेळात ती व्यक्ती पेपरमधल्या बातम्या सांगून दुसऱ्यांना कंटाळा आणते.” इथंही तुमचे निरीक्षण बरोबर आहेच.पण तरीही म्हणेन की, ज्या व्यक्तीबद्दल सांगत आहे, ती वेगळी आहे. ती तुमच्या माझ्यासारखी सहज वर्तमानपत्र विकत घेवू शकणारी नाही.तरीपण ती ते विकत घेते आणि वाचते.

तिचं खूप खूप कौतुक वाटतं कारण तिचा व्यवसाय असा आहे की, ज्याचा आपण सहज विचार करत नाही. ती शरीरविक्रय करते. रोजचे पहिले गिऱ्हाईक झाले की,ती पोटासाठी काही खायला घेण्याआधी वर्तमानपत्र विकत घेते आणि घेतल्या बरोबर जिथं जागा मिळेल तिथं वाचत बसते. तिचा हा गुण फार आवडतो. तिला जगात काय चालू आहे? हे समजून घेण्याची एवढी जबरदस्त इच्छा असते की विचारू नका. तिचं हे वाचणारं रूप फार लोभस वाटतं.

आपण ठरवून टाकलेलं असतं की, या बायकांना कसली आवड नसते. वाचनाची तर नाहीच नाही. किती चाकोरीबद्ध विचार करतो आपण नाही का? व्यवसाय आणि त्यातली माणसं याची समीकरण आपण ठरवलेली असतात.त्यापेक्षा कोणी वेगळं वागू शकतं यावर आपण लगेच विश्वास ठेवत नाही.

      आमच्या या वाचणाऱ्या आणि त्यावर बोलण्याची इच्छा असणाऱ्या मैत्रिणी सारख्या अनेकजणी आपल्याभोवती असतील. त्यांना काही बोलायची इच्छा असेल तेव्हा आपण नक्की त्यांच्याशी संवाद साधू या.तेवढीच आपली चाकोरीतून सुटण्याची संधी आपल्याला मिळेल. नाही का?

वंचित विकास कार्यालय – 7972086730