http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

यशस्विनी – ४ /  सुनंदा 

Posted By : Team Vanchit

यशस्विनी – ४                 

सुनंदा

            किंचित जाडी,गोरी, बुटकी, कायम हसतमुख असणारी सुनंदा समोर उभी राहिली. शेजारी तिचा उंच, शिडशिडीत नवरा आणि गोरागोमटा अवखळ छोटासा मुलगा. प्रसन्न कुटुंब होते. त्यांच्याकडे पाहून छान वाटत होते. पाहता पाहता तिचा भूतकाळ झर्रकन डोळ्यासमोर उलगडला.

सुनंदाचे लग्न तिच्या नवव्या वर्षी झाले. तेही तिच्यापेक्षा तिपटीने मोठया माणसाशी. लग्न म्हणजे काय हेही न कळण्याचे तिचे वय.नवरोबाची इच्छा वेगळीच असणार. त्याची  इच्छा पुरी होईना. त्यात तो दारू पिऊन मारहाण करायचा. माहेरहून पैसे आण म्हणायचा. ही एवढीशी पोर घाबरून जाई. रडत बसे. चार महिन्यातच माहेरच्यांनी तिला घरी नेले. परत पाठवलेच नाही. काही वर्षे सुनंदा माहेरीच राहिली. इयत्ता  चौथी पर्यंत शिक्षण झाले होते. पण लिहिता वाचता येत नव्हते. माहेरीही पुढील शिक्षण झाले नाही.

पुढे तिला वंचित विकासची कार्यकर्ती ताराताई हिच्याकडून सबला महिला केंद्राची माहिती मिळाली. आईवडिलांच्या परवानगीने ती केंद्रात शिकायला आली (मात्र सुरुवातीला त्यांनी तिला परवानगी दिलेली नव्हती. त्यांना खूप समजावून सांगितले तेंव्हा परवानगी दिली.). शिवणकामासोबत ती लिहायला वाचायला शिकली. इतरही अनेक गोष्टी शिकली. जगात कसे वागावे हे शिकली.

केंद्रात शिकून गेल्यानंतर लातूरमध्येच रहायला मिळावे म्हणून तिने लोकांकडे धुणीभांड्याचीही कामे केली. कारण, सुनंदा ही लातूरजवळच्या एका खेडयात राहणारी होती. शहरात आलेलो आहोतच तर काहीतरी करून दाखवावे, बनून दाखवावे असा तिचा विचार होता. काही काळ तिने अंबेजोगाई येथे एम.आय.टी.संस्थेत सेवाकाम केले. ही सगळी कामे करता करता तिने कोर्टात नवऱ्याच्या विरुद्ध दावा दाखल केला. ‘कोर्टातील भांडण खेळत’ तिने हा दावा जिंकला. तिला घटस्फोट मिळाला. त्यानंतर तिने आंतरजातीय विवाहही केला. विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह झाला.

तिच्या आई वडिलांची या विवाहास संमती होती. ती म्हणते, “लोकांना ठामपणे बोलण्याची ताकद, जगात वावरण्याचा धाडसीपणा, पुनर्विवाह करण्याचा निर्णय यासाठी लागणारा आत्मविश्वास सरांच्या आणि संध्याताईंच्या मार्गदर्शनामुळे आला.” कोर्टात भांडण जिंकणारे तिचे वकील श्री. शिंदे (हे वंचित विकासच्या सबला महिला केंद्राच्या सल्लागार मंडळाचे सभासद आहेत.) यांचीही खूप मदत झाली.

तिचे सासर लातूरमध्येच आहे. तिच्या नवऱ्याची व सासरच्या लोकांची खूप मदत तिला झाली. तिच्या वृद्ध सासूची शेवटपर्यंत तिने खूप सेवा केली. तिचा नवरा एका शोरूम मध्ये नोकरी करतो. त्याने एकटयाने संसार निभावणे तिला मान्य नव्हते. म्हणून तिने पापड,लोणची, वगैरे जेवणात उपयोगी पडणाऱ्या वस्तू तयार करून व विकून संसारास हातभार लावला. काही काळ तिने कपडयाचे दुकानही चालवले. आता तिने मेस चालवायला सुरुवात केलेली आहे. मेडिकल कॉलेजचे ३० विद्यार्थी मेसचे सभासद झाले. नवरा व दीर मदत करतात. दोन बायका मदतीला आहेत. आता मेस उत्तम चालते. पैसाही भरपूर मिळतो.

सुनंदा राजस्थानी महिला बचत गटाची सदस्य आहे. आधारवड बचत गटाची अध्यक्ष आहे. या बचत गटातून ती बचत करते. तसेच तिने एल.आय.सी. ची पॉलिसीपण काढलेली आहे. तिने रहाते घर सव्वा चार लाखाला विकत घेतले आहे. आणखी एक बंगला तिला बांधायचा आहे. चार चाकी गाडी पण तिला घ्यायची आहे.  मुलाला उत्तम शिक्षण द्यावयाचे आहे. एकेक स्वप्न पहात आणि ते सत्यात उतरवत सुनंदाची वाटचाल सुरु आहे. अडचणीत सापडलेल्या महिलांना ती मदत करते. अनेक महिलांना केंद्रात शिकण्यासाठी पाठवण्याचा प्रयत्न करते.

सुनंदा म्हणते,”संस्थेने मला सरता सरणार नाही अशी शिदोरी दिलेली आहे. आज मी चांगले जीवन जगत आहे. आयुष्याला उभारी आलेली आहे. संसार सुखाने चाललेला आहे.”

—————————————————————————————————————–