यशस्विनी – १४ / सिंधू

Posted By : Team Vanchit

      घाऱ्या डोळ्यांची, नाजूक चणीची, दिसायला सुरेख, गोरी गोमटी सिंधू दहावी पास झालेली होती. वयाच्या १५ व्या वर्षीच लष्करात भरती झालेल्या जवनाशी तिचे लग्न झाले. ती नवऱ्या सोबत ५ वर्षेच राहिली. तिला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. अचानक नवऱ्याचे निधन झाले. त्यावेळेस सासरच्या लोकांनी आधार दिला नाही. त्यामुळे मुलांना घेऊन ती माहेरी आली.

      आई वडिलांची परिस्थिती बिकट होती. आई वडील मोलमजूरी  करीत होते. अशा परिस्थितीत आपला व मुलांचा भार आई वडिलांवर पडणार आहे. मुलांच्या इच्छा, आवडी निवडी आपण कशा पूर्ण करणार आहोत? या विचाराने सिंधू उदास होत असे. एकदा वंचित विकासच्या कार्यकर्त्या रंजना चव्हाण, सिंधूच्या शिवणखेड या गावाला आल्या होत्या. त्यांच्याकडून केंद्राची माहिती तिला मिळाली. सिंधूच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना ही रंजनाने सबला महिला केंद्र, लातूरची माहिती दिली.पण त्यांचा विश्वास बसत नव्हता. लातूर सारख्या शहरात मुलीला कसे पाठवावे, तिच्या सुरक्षेचे काय? असे विचार आई वडिलांच्या मनात येत होते, रंजना चार वेळेस सिंधूच्या घरी गेली होती. चिवटपणे जायचे, सतत समजुतीने बोलत बोलत रहायचे हे रंजनाचे चालूच होते. तरीही वडिलांचा विश्वास बसत नव्हता. सिंधूला मात्र भवितव्याची काळजी वाटत होती. तिने वडिलांची समजूत घातली. ती स्वतः केंद्र बघायला लातूर येथे जाऊन आली. तेथील वातावरण सिंधूला आवडले. आणि ती केंद्रात मुलीला घेऊन दाखल झाली.

     केंद्रात आल्यावर लक्षात आले, सिंधू खूप हुषार आहे. तिचे हस्ताक्षर चांगले आहे. ती उत्तम कविता करते. हळूहळू ती उत्तम बोलायला शिकली. ती पटापट अनेक गोष्टी शिकली.

     केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एक महिन्यातच वंचित विकास ने सिंधूची नेमणूक लातूरच्याच सबला महिला केंद्रात केली. ती तिच्या मुलांसह केंद्रात येऊन राहिली व काम करू लागली.

     मात्र थोडयाच अवधीत तिची मुलगी वारंवार आजारी पडू लागली व लवकरच ती वारली. तेंव्हा सर्व उलगडा झाला. सिंधूचा नवरा एडस या आजाराने गेला होता. तो रोग त्याने सिंधू आणि तिच्या मुलीला दिला. सिंधूच्या दोन्ही मोठया मुलांना एच.आय.व्ही. चा संसर्ग झालेला नाही. याचा सरळ अर्थ असा आहे, सिंधू सारखी बायको घरात असतानाही तो ‘दुसरीकडे’ गेला. त्यात त्याला लागण झाली. सध्या शहरातील एच.आय.व्ही. ची लागण कमी होत आहे. पण खेडयापाडयात, आदिवासी भागातही एच.आय.व्ही. ची लागण वाढत आहे.

     मुलगी वारल्यावर सिंधू पार उध्वस्त झाली. कैक महिने ती माहेरीच होती. तिची खूप समजूत घालावी लागली. त्यानंतर ती कामावर परत आली.

     एकीकडे सबला महिला केंद्राचे काम, फावल्या वेळात अभ्यास व बाहेरून परीक्षा देणे असा तिचा क्रम सुरु झाला. माहेरची परिस्थिती बदलू लागली. सासूनेही थोडा आधार दिला. आयुर्विम्याचे हप्ते भरणे, पोस्टातील आवर्ती  ठेव योजनेत पैसे गुंतवणे तिने चालू  केले.

     खेडयातील बायकांशी, विशेषतः विधवा व परित्यक्ता महिलांशी संपर्क साधणे, त्यांना केंद्राची माहिती देणे, त्यांना केंद्रात आणणे, प्रशिक्षणात एखादया विषयाची माहिती देणे, केंद्रातील महिलांना सांभाळून घेणे, त्यांची निराशा कमी करणे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे ही कामे सिंधू उत्तम प्रकारे करू लागली.

     स्वतः सिंधू मध्ये प्रशिक्षण घेतल्यापासून खूपच बदल झालेला होता. ती म्हणते, “मी विधवा आहे. समाजाला तोंड कसे दाखवावे असे सुरुवातीला मला वाटत असे. पण केंद्रात शिकून गेल्यापासून मी विधवा आहे असे मला वाटतच नाही. मी समाजात ताठ मानेने वावरत आहे.” हाच आत्मविश्वास परित्यक्ता आणि विधवा महिलांमध्ये निर्माण करण्याचा तिने प्रयत्न केला व त्यात ती यशस्वी पण झाली.

     मुलांना वडील नाहीत याची जाणीव त्यांना होऊ दयायची नाही व त्यांना उत्तम प्रकारे शिक्षण  दयायचे हे तिच्या समोरचे कौटुंबिक ध्येय आहे. समाजात परित्यक्ता निर्माण होऊच नयेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून सामाजिक ऋण तिला फेडावयाचे आहे. नुकतीच सिंधू बी.ए. झालेली आहे.

     वंचित विकास संस्थेमुळे आणि चाफेकर सरांमुळे नवीन जीवन जगण्याला दिशा मिळाली, असे तिला वाटते.

————————————————————————————————————–