Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /nfs/c09/h03/mnt/128656/domains/vanchitvikas.org/html/wp-includes/pomo/plural-forms.php on line 210
पिवळी इमारत - Vanchit Vikas

पिवळी इमारत

Posted By : Team Vanchit

दि. ०४/०१/२०२०        ती पिवळी इमारत

आज सकाळ पासूनच लालबत्ती परिसरात आमच्या संस्थेचे कार्यकर्ते ‘ पिवळी इमारत, कचराकुंडी जवळ ‘ हा पत्ता शोधत होते. संस्थेच्या वस्तीतील दवाखान्यात एका ठराविक वेळेला कानडी भाषेत बोलणाऱ्या मुलीचा फोन येत होता. तिला एका घरात  कोंडून ठेवले होते. कर्नाटकातील एका दूरच्या गावातून तिला फसवून आणले होते. मला येथून बाहेर काढा असे ती फोनवरून कळवळून सांगत होती. भाषेचा अडसर पार करून कार्यकर्त्यांना एवढेच समजत होते, ती पिवळी इमारत, कचराकुंडी जवळ रहात आहे.

ही सर्व बातमी गुप्त ठेवून कार्यकर्त्यांनी त्या जागेचा शोध चालू केला. बुधवार पेठेत संस्थेचे काम गेली बरीच वर्षे (१९९५ पासून) चालू आहे. लालबत्ती परिसरामध्ये आपल्या संस्थेचे नाव आदराने घेतले जाते. त्याभागामध्ये आपल्या ओळखी पण खूप आहेत.  त्या परिसरातील प्रत्येक इमारतीचा आणि इमारतीतील प्रत्येक मजला पिंजून काढला. कोणालाही संशय येणार नाही अशा पध्दतीने शोध हा चालूच होता. शेवटी  एकदाची  ती कचराकुंडी शेजारील पिवळी इमारत सापडली ! तिला त्या पिवळ्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील कपाटामध्ये कोंडून ठेवले  होते ! बाथरूमला जाण्यासाठी तिला बाहेर सोडले जात असे, त्यावेळी दवाखान्याच्या माहितीचा कागद तिला मिळाला होता. या दवाखान्यातील डॉक्टर्स, कर्मचारी चांगले लोक असतील या  भावनेने ती संधी मिळेल तेंव्हा फोन करीत असे.

तिला कार्यकर्त्यांनी ओळखले, शेवटी ती एकदाची सापडली. पण तिची थेट सुटका करणे धोकादायक होते. म्हणून पोलिसांना कळविण्यात आले. त्यांना सर्व माहिती देण्यात आली. पोलीस आले. पण त्यांनी छापा टाकेपर्यंत तिला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले होते.

पुढे बऱ्याच दिवसांनी ती कार्यकर्त्यांच्या समोर आली तेंव्हा ती शरीरविक्रय व्यवसायात पूर्णपणे सक्रीय झालेली होती. तिचे परतीचे रस्ते बंद झालेले होते. पुढे काम करताना अशा अनुभवांचा खूप उपयोग झाला.

(वंचित विकास संस्था, पुणे ही १९९५ पासून लालबत्ती भागात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, स्व-ओळख निर्माण करणे संबंधी काम करीत आहे. महिलांना  शोषणमुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे. नाईलाजाने, फसवणुकीने, जबरदस्तीने आलेल्या, आणलेल्या या दुर्दैवी महिलाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.)