दै. सकाळ, टुडे – गुरुवार दि.१८ जानेवारी २०१८ – आठवण, ‘अभया’च्या माध्यमातून महिलांना आधारवड, मीना कुर्लेकर

Posted By : Team Vanchit

ती दु:खात होती… तिच्या पतीचे निधन झाले होते… पोटचा मुलगा तिला विचारत नव्हता… डोळ्यात अश्रू अन हतबल असलेली ती माझ्याकडे आली. तिने आपले दु:ख आणि वेदना मला सांगितल्या. तिला व्यक्त होण्यासाठी एक माध्यम मिळाले. तेव्हाच ठरवले तिच्यासारख्या अनेक जणींसाठी काहीतरी करावे अन त्यातून आकाराला आला तो अभया गट. वंचित विकासच्या ‘पुणे सबला महिला केंद्रा’च्या माध्यमातून मी गेली २५ वर्षे महिला सक्षमिकरण आणि पुनर्वसनासाठी काम करतच होते.  पण अभया गटाने त्याला वेगळी वाट करून दिली. अभया गटाची स्थापना चार वर्षापूर्वी झाली. तो दिवस सदैव माझ्या आठवणीत बंदिस्त आहे. त्या दिवशी सर्व जणी मनमोकळ्या आणि अगदी मनातल बोलल्या. याच व्यक्त होण्याने त्यांना धीर मिळाला आणि साथही. एकट्या पडलेल्या, कुटुंबियांना त्रासलेल्या महिलांना आधारवड मिळाला आहे. गप्पा, गोष्टी, गाणी तर इथे होतातच; पण गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात महिलांना उत्साह, उर्जा व आनंदही मिळतो. आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोनही त्यांना मिळाला. त्यातल्या प्रत्येकीच्या चेहर्यावरच हास्य चिरंतन स्मरणात राहत.