गणेश मंडळातील तरुणांना आव्हान

Posted By : Vilas Chaphekar
नुकताच वंचित विकासच्या दवाखान्यात एक कार्यक्रम झाला, भाऊबीजेचा. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी. पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यासाठी आले होते. शरिरविक्रय करणाऱ्या काही स्त्रिया गरत्या बायकांप्रमाणे नटून आल्या होत्या. त्यांनी या भावांना ओवाळले. दोन पोलिस सब इन्स्पेक्टरही आले होते.. त्यांनाही या बहिणींनी ओवाळले. सर्व भावांनी या अनोख्या बहिणींना भेटवस्तू देऊन ओवाळणी घातली. या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत होता. अन त्याच वेळी त्यांचे डोळे पाण्यानी डबडबले होते. अनेकींच्या आयुष्यात भाऊबीजेचा हा क्षण पहिल्यांदाच उगवला होता. मोठ्या आनंदाचा आणि समाधानाचा ह क्षण होता. गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
गणेशोत्सवामुळे अनेक तरुण सामजिक क्षेत्रात पहिले टाकतात. गणेशोत्सव त्यांची कार्यकर्ता म्हणून जडणघडण होते. त्यातुन समाजाला व राजकारण्यांनाही कार्यकर्ते लाभतात. गणेशोत्सव हे
कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयात होणारे कार्यकर्ते ही समाजाची विधायक शक्ती आहे.
फक्त या मंडळात तरुणी, मुली व स्त्रिया का नसतात ? त्यांनाही त्यात सामील केले तर स्त्री पुरुष संबंधांना खूपच विधायक वळण लागेल.
गणेशोत्सव मंडळाची विधायक शक्ती आणखी अनेक क्षेत्रात उपयोगी ठरु शकेल. सर्वच समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. स्त्रिया असुरक्षित राहतात. शाळा-कॉलेजात जाताना, फिरायला जाताना, कुठेही त्यांची छेड काढली जाते. त्यांचा विनयभंग केला जातो. अनेकदा महिलांवर अत्याचार होतात. त्यांच्यावर बलाक्तार केले जातात. कोणत्याही समाजात स्त्री असुरक्षित राहिली तर साऱ्या समाजाचेच आरोग्य धोक्यात येते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत स्त्रियांवर बलात्कार केले जातात. मुलींचा पोषाख, तरूणींची वागणूक त्याला जबाबदार असल्याचे म्हटले जाते. हा समाजाचा ढोंगीपणाआहे. ‘मी मर्द आहे, स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे’ हा पुरुषीवाद आणि पुरुषांमधली अनावर भोगलालसा हीच बलात्काराला कारणीभूत आहे.
हे बदलले पाहीजे. स्त्री ही भोगवस्तू नाही. ती पुरुषाची दासी नाही. पुरुषांची विकृत कामलालसा भागवण्यासाठी तिचा जन्म झालेला नाही. अरे, निसर्गाकडे पहा, त्याला समजून घ्या. ही सृष्टी टिकली पाहिजे, त्या निसर्गाने स्त्री आणि पुरुष निर्माण केले. दोघेही समान आहेत. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाने, सहकार्याने हा संसार फुलवला पाहिजे. यात जोरजबरदस्तीचा प्रश्न येतोच कुठे ?
जर कोणी छेडछाड करत असेल, विनयभंग करत असेल, बलत्कार करत असेल तर तो या सृष्टीचाच अपमान करतोय. बलात्कार फक्त शरीरालाच ओरबाडत नाही तर स्त्रीच्या मनालाच, आत्म्यालाच उद्‍ध्वस्त करतो. हे चालणार नाही. हे करणाऱ्याला योग्य वळण लावलच पाहिजे. श्री गणेशोत्सव मंडळातील तरुण कार्यकर्त्यांना हे आव्हान आहे. हे आव्हान स्विकारणार का? जोरजुलुम, जबरदस्ती, छेडछाड, स्त्रीवरील आक्रमण, बलात्कार याविरोधी आंदोलन उभारणार का ?